पुरंदर रिपोर्टर Live
निरा | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे आता जोरात वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या निवडीसाठी चाचपणी सुरू केली असून, पुरंदर तालुक्यातील निवडणुका यंदा विशेष चुरशीच्या होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांसह आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व इतर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत ताकदीने उतरायची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक गटात स्थानिक स्तरावर प्रबळ गटबाजी व राजकीय समीकरणे तयार होत आहेत.
दरम्यान, निरा-शिवतक्रार जिल्हा परिषद गटात यंदा नागरिक मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) हे आरक्षण पडल्याने उमेदवारांच्या चर्चेला उधाण आले आहे. पुरंदर तालुक्यातीलअनेक दिग्गजांनी या गटाचे प्रतिनिधित्व केल्याने तालुक्यात या गटाकडे सर्वच नेते मंडळी तसेच राजकीय पक्षांचे लक्ष आहे. या गटात निरा शिवतक्रार, कोळविहिरे, राख, गुळूंचे, कर्नलवाडी, वाल्हे, जवळार्जुन, जेजुरी ग्रामीण आणि पिंपरे या मोठ्या गावांचा समावेश आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या या गटात सर्वच पक्ष आपला दावा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
निरा ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप धायगुडे यांनी आपल्या पत्नीला या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असा आग्रह व्यक्त केला आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायत सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली असून “भैरवनाथ उद्योग समूह” या नावाने स्थानिक पातळीवर व्यावसायिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांचे काका, माजी सरपंच चंद्रराव धायगुडे यांचे स्थानिक सामाजिक व राजकीय वर्तुळात चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
धायगुडे हे माजी आमदार संजय जगताप यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र, इतर पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने सर्वच गटांमध्ये त्यांची चर्चा रंगली आहे. त्यांनी माजी आमदार संजय जगताप यांच्याकडे उमेदवारीबाबत तयारी दाखवली असून, निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली आहे.
संदीप धायगुडे यांच्या सक्रियतेमुळे निरा-शिवतक्रार जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे अधिकच रंगू लागली असून, आगामी निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

0 Comments